नुकताच पुण्यामध्ये बस-डे साजरा झाला. सकाळने हा उपक्रम सुरु केला आणि राबवलादेखील. आधी नुसती संकल्पना असलेला हा उपक्रम अनेक छोट्या मोठ्या लोकांच्या सहकार्याने पार पडला.
उपक्रम जेव्हा फक्त संकल्पना होता तेव्हापासून सकाळने सावकाश प्रसिद्धी करायला सुरुवात केली. हळुहळू काही प्रसिद्ध लोकांना पुढे केलं गेलं. या लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले गेले. ते सकाळमध्ये छापले गेले. रोजच्या रोज या उपक्रमाची जाहिरात सकाळमध्ये येऊ लागली. मग देणग्या सुरु झाल्या. अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यांनी जमेल तशी देणगी दिली. प्रचंड मोठा निधी जमा झाला. आणि अखेरीस हा दिवस पार पडला.
मी रोज सकाळचा ई-पेपर वाचतो. दुसऱ्या दिवशी पेपर उघडला तर पहिल्या पानावर बस-डे बद्दल बातम्या. तिथेसुद्धा कलमाडीसारख्या माणसाला व्यासपीठावर संधी दिली गेली याबद्दल वाईट वाटलं. दुसऱ्या पानावर तशाच बातम्या. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या….. २ नोव्हेंबरच्या ई-सकाळ च्या सगळ्याच्या सगळ्या १० पानांवर फक्त आणि फक्त बस-डे. साहजिकच माझ्या मनात विचार आला बाकीच्या बातम्यांना काही महत्व नाही का??
बस-डे हा उपक्रम निश्चित चांगला आहे. त्याच्यामागे असलेला हेतू चांगला आहे. त्यासाठी लोकांनी देणग्या देणंदेखील चांगलं आहे. पण हे सगळं केल्यानंतर एक वर्तमानपत्र म्हणून सकाळने इतर बातम्या न छापता केवळ आपल्या उपक्रमाचे गोडवे गाण्यात सबंध पेपर वाया घालवावा हे मनाला पटत नाही. बाकीच्या जगात जे काही झालं त्याला काहीच महत्व नाही का?? वर्तमानपत्र हे एक तटस्थ माध्यम आहे असं माझं मत आहे. असं असताना सकाळसारख्या माध्यम समूहाने बाकीच्या बातम्या न छापण्यापर्यन्त जाणे हे फारसं पटलं नाही. दुसरीकडे लोकसत्ताला सोनियांवर १५०० कोटी बळकवल्याचा आरोप केला गेला होता. (इथे लोकसत्ताची प्रसिद्धी करण्याचा हेतू नाहीये.) हा इतका मोठा विरोधाभास एक प्रश्नचिन्ह उभं करतो.
दुसरा मुद्दा असा की ज्या पद्धतीने अनेक सेलेब्रेटीजचे इंटरव्ह्यूज घेतले गेले. ज्यांनी बसने प्रवास केला ते लोक इथून पुढे कायम बसने प्रवास करणार आहेत का? केवळ एक दिवस प्रवास करून वाह वाह!!! छान छान असं म्हणणं सोपं आहे. जे लोक रोज बसने प्रवास करतात त्याच्या समस्या तेच जाणतात. एक दिवस बसने प्रवास करून काय कळणार आहे?? माझ्या एक मित्राने चांगला निर्णय घेतला. त्यानं ठरवलं की या दिवशी आपण बसने प्रवास करायचा नाही. कारण रोज हजारो लोक बसने प्रवास करतात. आपण केवळ आज बस-डे म्हणून प्रवास करायचा आणि उगाचच गर्दीमध्ये भर का टाकायची?? मला त्याचा निर्णय पटला. अजून कोण्या एक मित्राने लिहिलं होतं की केवळ मुख्य मार्गांवर जास्त बसेस सोडल्या होत्या. बाकी मार्गांवर नेहमीचं वाट पाहणं आणि गर्दीतून प्रवास यातून लोकांची सुटका झालीच नाही. ज्या देणग्या घेतल्या गेल्या त्याचा उपयोग खरोखर बससेवा सुधारण्यात झाला तर बर होईल. या अगोदर असे किती निधी आले आणि गेले. पुण्याची बससेवा अजूनही तशीच आहे.
असे बस-डे अजूनही झाले पाहिजेत हे मान्य. पण हे करत असताना सामान्य माणसाला विचारात घेउन करावं. उपक्रम निश्चितच विधायक आहे. पण तो केवळ उपक्रम राहू नये हीच केवळ इच्छा.