इशांतची शंभरी 

भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज (होय माझ्यासाठी तो आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे.) इशांत शर्मा आज त्याचा १०० वा कसोटी सामना खेळतोय.  भारताकडून आजतागायत फक्त दहा खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे. इशांत अकरावा.

इशांत गेली तब्बल १४-१५ वर्षे भारताकडून क्रिकेट खेळतो आहे. इशांत जेव्हा भारताकडून क्रिकेट खेळू लागला तेव्हा सुरुवातीला जसे सगळे गोलंदाज चमक दाखवतात तशी त्यानेही दाखवली. अगदी दुसऱ्याच दौऱ्यात त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॉंटिंग ला दिलेला त्रास कुणी कसं विसरू शकेल?

कुंबळेचा “एक और करेगा?” हा प्रश्न आणि इशांतचं “हां करुंगा.” हे उत्तर अजूनही ठळकपणे आठवणीत आहे.

यथावकाशपणे जे बऱ्याच भारतीय वेगवान गोलंदाजांचं होतं, तेच इशांतचं झालं. इतकं की लोक त्याला ट्रोल करू लागले. मीसुद्धा त्याला भरपुर ट्रोल केलंय. इशांत मात्र सगळ्यांना पुरून उरला. माझ्या माहितीत असे अनेकजण आहेत जे आज इशांतच्या कामगिरीला मनापासून दाद देतात. आजच्या जमान्यात १०० कसोटी सामने खेळणे साधी गोष्ट नाही. शंभर कसोटी खेळलेल्या भारतीयांच्या यादीत कपिल आणि इशांत हे दोघेच वेगवान गोलंदाज. त्यानंतर ९२ कसोटी खेळलेला झहीर आहे. त्यानंतर थेट ६७ सामने खेळलेला श्रीनाथ. अगदी इतर देशांच्या खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तरी अलीकडच्या काळातले अँडरसन, ब्रॉड ह्याच वेगवान गोलंदाजांनी १०० सामने खेळले. त्याआधी वॉल्श, मॅकग्रा वगैरे मोठे खेळाडू. यावरून इशांतची कामगिरी खरंच मोठी आहे हे ध्यानात येईल. मी तुलना करत नाहीये. एखाद्या वेगवान गोलंदाजाने देशासाठी १०० कसोटी खेळणे खरेच किती अवघड असू शकते हे सांगतोय.

इशांतने नुकताच  ३०० कसोटी बळींचा टप्पा गाठला. झहीरचा ३११ बळींचा विक्रम तो लवकरच मोडीत काढेल असा मला विश्वास वाटतो. या दोघांची कसोटीमधील आकडेवारी जवळपास सारखीच आहे. मात्र अजाणतेपणी म्हणा किंवा अजून काही, इशांतला झहीर एवढा आदर आजही मिळत नाही. त्याची वनडेमधली कामगिरी तितकीशी चांगली नाही हे त्याचे कारण असू शकेल.

इशांतने २००७ ते २०११ दरम्यान १३० बळी घेतले. मात्र या पाचपैकी तीन वर्षांत त्याची सरासरी ३५ हुन तर इकॉनॉमी ३.५ हुन अधिक होती. याच इशांतने गेल्या चार वर्षात ९० बळी मिळवले आहेत. यात त्याची सरासरी २०१७ सोडलं तर इतर चार वर्षांत २३ हुन कमी आहे आणि इकॉनॉमी ३ हुन कमी आहे.
२०१८ च्या सुरुवातीपासून त्याची सरासरी १९.३४ एवढी आहे जी एक जेसन होल्डर सोडला तर इतर सगळ्या वेगवान गोलंदाजांपेक्षा कमी आहे.

इशांतची कारकीर्द दोन भागांत विभागली तर पहिल्या ४९ कसोटीत त्याने ३८.५३ च्या सरासरीने १३८ बळी मिळवले होते. तर नंतरच्या ४९ कसोटीत २६.९८ च्या सरासरीने १६२ बळी मिळवले. यावरून इशांतने एक गोलंदाज म्हणून स्वतःमधे बरीच सुधारणा केली हे मान्यच करावे लागेल. प्रत्येक खेळाडूमध्ये हे बदल अनुभवाने येतात हे जरी खरे असले तरी इशांतला त्याचे श्रेय दिलेच पाहिजे.

त्याने वेळीच काळाची पावले ओळखत स्वतःला फक्त कसोटी क्रिकेतपुरते सीमित ठेवण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याने आपला फिटनेस राखण्यावर भर दिला. इथे कोहलीने संघात आणलेल्या फिटनेस कल्चरचा त्याला फायदा झाला असे म्हणता येईल. आपल्या कामगिरीने त्याने टीकाकारांची तोंडे बंद केली. कारकिर्दीच्या सुरुवातीला स्वतः इशांतला आपण १०० कसोटी खेळू यावर विश्वास बसला नसता. एका माणसाला मात्र इशांत ही कामगिरी करू शकतो हे २००६ मध्येच कळलं होतं. तो माणूस होता त्यावेळचा १९ वर्षाखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक लालचंद राजपूत. राजपूत यांनी एका मुलाखतीत तेव्हाच सांगितलं होतं,

“सिर्फ देखने मे ही लंबा नही, बल्की लंबी रेस का घोडा है इशांत.”

इशांतने त्यांचं म्हणणं खरं करून दाखवलं.

एकवेळ खराब कामगिरीने संघाबाहेर फेकला गेल्याने आपली कारकीर्द संपल्यात जमा आहे असे वाटून इशांत बायकोजवळ ढसढसा रडला होता. नंतर हाच इशांत दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्याला दिलेली चांगल्या कामगिरीची जोड याच्या जोरावर आज ह्या मोठ्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. इशांतची महान गोलंदाज म्हणून गणती होणार नसली तरी भारताचा एक चांगला गोलंदाज म्हणून त्याचे नाव पुढे बरीच वर्षे घेतले जाईल यात शंका नाही. उरलेल्या कारकिर्दीसाठी इशांतला शुभेच्छा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.