भारतीय क्रिकेटचा ‘मल्टीबॅगर’

आपल्याकडे मुलगा ग्रॅज्युएट झाला, नोकरीला लागला की घरातले लोक सुरु होतात.

“आता कॉलेज संपलंय. तू नोकरीला लागलायस. आता हळूहळू जबाबदाऱ्या घ्यायला शिक.”

मग टप्प्याटप्प्याने त्याला घरातल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सामावून घेतलं जातं. ज्या गोष्टींची चर्चा सुरु असताना आधी “तुला काय करायच्यात या गोष्टी माहित करून?” असं म्हटलं जायचं, त्याच गोष्टींमध्ये आता त्याचं मत विचारात घेतलं जाऊ लागतं. मुलाचा आता पुरुष होण्यास सुरुवात झालेली असते.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पौरुषत्वाकडे वाटचाल सुरु केलेला मुलगा म्हणजे शुभमन गिल. शुभमन भारतीय संघात आला तोच मुळी प्रतिभावान म्हणून. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याची निवड झाली तेव्हा त्याला प्रत्यक्ष खेळण्याची संधी मिळेल किंवा नाही याबद्दल शंका होती. मात्र पहिल्या कसोटीत भारताची झालेली वाताहत, शुभमनचा अंडर-१९ चा कर्णधार पृथ्वी शॉने खाल्लेली माती यामुळे बॉक्सिंग डे टेस्टमध्ये शुभमनला भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्या डावात ४५ आणि दुसऱ्या डावात नाबाद ३५ धावा करून त्याने आपले पदार्पण तर झोकात केले. या दोन्ही डावांत शुभमनचे काही शॉट्स असे होते की अनेकांच्या तोंडातून आपसूकच, “काय शॉट मारलाय!” असं बाहेर पडलं होतं.

पुढच्या कसोटीत त्याने आपलं पहिलं अर्धशतक साजरं केलं आणि पहिल्या कसोटीतली आपली कामगिरी फ्लूक नव्हती हे सिद्ध केलं. या दोनही सामन्यांत शुभमन मैदानात असताना हर्षा भोगले, एरवी सहसा कुणाला पटकन चांगलं न म्हणणारे संजय मांजरेकर यांच्याबरोबरच इतर ऑस्ट्रेलियन समालोचकांनी शुभमनचं भरभरून कौतुक केलं होतं. चौथ्या शेवटच्या कसोटीत मात्र शुभमनने कमाल केली. अगदी कसलेल्या कसोटी फलंदाजाला शोभेल अशी फलंदाजी करत त्याने दुसऱ्या डावात ९१ धावा काढल्या. अनेक कारणांनी लक्षात राहणाऱ्या  या कसोटीतली शुभमनची ही खेळी पुढची काही वर्षे स्मरणात राहील. भारतीय संघ अडचणीत असताना त्याने पुजाराबरोबर चांगली भागीदारी रचली. गॅबावर सकाळच्या सत्रात रोहित बाद झाल्यावर कमिन्स, हेझलवूड आणि स्टार्क यांच्या माऱ्याला त्याने अगदी नेटाने तोंड दिलं. स्टार्क, कमिन्सचे काही चेंडू १४५ किमी प्रति तासाहून अधिक वेगाने येत होते.  “सी यू ऍट गॅबा” म्हणणाऱ्या ऑसीजचा शेवटच्या दिवशी भारताचा चुराडा करायचा मनसुबा होता. शुभमन आणि पुजाराने ह्या मनसुब्यांना सुरुंग लावला.

या मालिकेतल्या शुभमनच्या खेळीचे हायलाईट्स बघा. तो नवखा आहे हे निश्चित जाणवत होतं. पण त्याचे शॉट्स असे होते की तुम्ही म्हणत होतात, “हा पोरगा नक्की पुढे जाणार.” नवा खेळाडू बऱ्याचदा चांगल्या चेंडूवर चकला की खराब चेंडूसुद्धा सावधच खेळतो. शुभमनचे हायलाईट्स पाहिलेत तर त्याच्या खेळात हे अजिबात दिसणार नाही. खराब चेंडूंना तो खराब चेंडू म्हणूनच खेळला. कसोटीत अनेकजण येतात आणि जातात. ते येतात म्हणजे निश्चितच त्यांच्याकडे गुणवत्ता असते. फलंदाज म्हणून विविध फटके तर गोलंदाज म्हणून विविध प्रकारचे चेंडू भात्यात असतात. यात काही चूक झाली तर ती सुधारता येते आणि कामगिरी उंचावता येते. शुभमनकडे हे सगळं आहेच. याबरोबरच त्याच्याकडे आहे तो योग्य ऍटिट्यूड. तो नसेल तर नुसत्या गुणवत्तेला अर्थ  उरत नाही. शुभमनने या मालिकेत आपल्यातल्या ऍटीट्युड दाखवला. मी कसोटीत खेळू शकतो आणि चांगली कामगिरीही करू शकतो हे सिद्ध करण्यासाठी त्याने थेट ऑस्ट्रेलियाची निवड केली. इथं टिकला तो इतर कुठेही टिकू शकतो असा संकेत आहे. त्यामुळे शुभमनची ही कामगिरी महत्वाची ठरते.

शेअर बाजारात इव्हेस्टमेन्ट करताना काही शेअर आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतो. दरम्यानच्या काळात तो खाली आला तरी त्याचं फारसं काही वाटून न घेता कंपनीच्या फंडामेंटल्सवर विश्वास असल्याने त्यातली गुंतवणूक कायम ठेवतो. काही वर्षांनी हाच शेअर मल्टीबॅगर ठरून आपली इन्व्हेस्टमेंट दुप्पट, तिप्पट करून देतो. याआधी भारताला असे अनेक मल्टीबॅगर लाभले आहेत. शुभमन गिल हा भारतीय क्रिकेटचा पुढचा मल्टीबॅगर ठरू शकतो असं मला मनापासून वाटतं.

शुभमनच्या या दौऱ्यातल्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष असणार होतं. त्यानेही आपल्याकडून असलेल्या अपेक्षा खऱ्या ठरवत ५१ च्या सरासरीने २५९ धावा काढल्या. अशाच ऑस्ट्रेलिया दौऱ्याने याआधी अनेकांची कारकीर्द संपवलेली आहे. शुभमनने मात्र पदार्पणाच्या मालिकेतच आपण कसोटी खेळाडू म्हणूनही तयार आहोत असा विश्वास निवड समितीला दिला. त्याच्या या कामगिरीमुळे पुढच्या मालिकांसाठी त्याच्याकडे फार काळ दुर्लक्ष करणे निवड समितीला अवघड जाणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.