हिंदुहृदयसम्राट


आज सकाळी झोपेतून उठलो तर बातमी कळली. लॅपटॉप उघडत असताना नकळत दादांना (माझे वडिल) फोन लावला गेला. बाळासाहेब गेले हे त्यांनी सांगितलं आणि त्यानंतरचे काही सेकंद दोघेही शांत राहिलो. अतिशय वाईट बातमी होती. वास्तविक पाहता मी आणि माझे वडिल कोणत्याच पक्षाचे समर्थक नाही. पण बाळासाहेबांबद्दल त्यांना आणि त्यांच्यामुळे मला प्रचंड आदर होता आणि राहील. दादांशी बोलताना मग नकळत अनेक गोष्टी समोर आल्या.
मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार होतोय हे साहेबांच्या लक्षात आलं. ते थांबवण्यासाठी एक लढाऊ संघटना उभी करायची ह्या हेतूने शिवसेना स्थापन झाली. शिवसेना हे नाव साहेबांचे वडिल प्रबोधनकार ठाकरे यांनी सुचविलं. पक्षाचं चिन्ह निवडतानादेखील आपला लढाऊपणा त्यातून दिसला पाहिजे ह्या हेतूने वाघ हे चिन्ह निवडलं गेलं. यथावकाश अनेक लोक शिवसेनेमध्ये येत राहिले. येणाऱ्यांची संख्या ही नेहमीच जाणाऱ्यांच्या संख्येहून जास्त होती. अगदी हॉटेलमध्ये असणाऱ्या पोरयापासूनते वरिष्ठ अधिकारी वर्गापर्यंत मी शिवसैनिक आहे असं अभिमानानं सांगणारे कित्येकजण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये होते. कार्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण यांना भेटल्यानंतर त्यांची एक व्यंगचित्रकार म्हणून वाटचाल सुरु झाली आणि मार्मिकमुळे एक नविन पर्व सुरु झालं. त्याकाळी लोक मार्मिकची वाट पहायचे ते केवळ त्यात असलेल्या साहेबांनी काढलेल्या व्यंगचीत्रांमुळे आणि त्यांच्या असलेल्या राजकीय टीकाटिपण्णीमुळे.
हळूहळू शिवसेना ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि मग सबंध महाराष्ट्रामध्ये पसरली. एक प्रादेशिक पक्ष असूनही दिल्लीश्वरांना शिवसेनेबद्दल दरारा वाटत असे. मुंबईचे आणि पर्यायाने महाराष्ट्राचे राजकारण शिवसेनेला वगळून कधीही होऊ शकले नाही.
मुंबईमध्ये धुलिवंदन मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं. पण ते करत असताना कोणत्याही महिलेला शिवसैनिकांनी त्रास दिला नाही आणि इतर कोणी देणार नाही याची काळजी देखील घेतली. याला कारण म्हणजे साहेबांबद्दल असलेली आदरयुक्त भीती आणि साहेबांचे संस्कार.
हा सिलसिला चार दशके सुरु राहिला. हे करत असताना राजकारणामध्ये ताणले गेलेले संबंध घरगुती संबंधांच्या आड येणार नाहीत याची पुरेपूर काळजी साहेबांनी घेतली. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार आणि त्यांची असलेली मैत्री. बाहेर त्यांना बारामतीचा म्हमद्या असं म्हणणारे साहेब त्यांचे परममित्र होते हे सर्वज्ञात आहे. सुप्रिया सुळे त्यांना आवर्जून काकाच म्हणायच्या. अजून एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले होते. एकदा मुंबई पुणे प्रवासात एकमेकांना क्रॉस होत असताना छगन भुजबळांना कळलं की पलिकडे साहेब आहेत. गाडी थांबवण्यात आली. गाडीमधून त्यांची पत्नी उतरली आणि जावून साहेबांच्या पाया पडली. केवळ सत्तेसाठी भुजबळ शिवसेना सोडून गेले. पण त्यानंतरदेखील साहेबांनी कौटुंबिक संबंध तितकेच जपले.
मुंबई केंद्रशासित करायची असं घात केंद्राने आणि महाराष्ट्र सरकारने घातला होता. केवळ शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिली. मुंबई सगळ्या भारतीयांची आहे असं म्हणणारा सचिन तेंडूलकरदेखील त्यांच्या तडाख्यातून सुटला नाही तिथे इतरांची काय कथा. अतिशय जिव्हारी लागणारी आणि झोंबणारी वक्तृत्व शैली. अगदी इंदिरा गांधींपासून ते नारायण राणेपर्यन्त साहेबांनी कधीच कोणाचीच पर्वा केली नाही.  जे वाटलं तेच बोलले. भुजबळांना लखोबा लोखंडे, राणेंना नाऱ्या ही नावे त्यांनीच दिली. मुसलमानांना लांडे हा शब्द जाहीरपणे वापरलेला हा पहिला आणि एकमेव माणूस. पाकिस्तानच्या सीमेवर उभं राहून सगळे भारतीय मुतले तर तिकडे पूर येईल असं बोलू शकणारा माणूस येणाऱ्या कित्येक दशकांमध्ये सापडणार नाही.
कधीही सक्रीय राजकारणात न येता साहेबांनी आपला पक्ष उभा केला. शिवसेनेचा रिमोट कंट्रोल असा शब्द त्यांनीच पहिल्यांदा वापरला. महाराष्ट्रामध्ये साहेब म्हणून जन्माला आलेली केवळ ३ चं माणसे .यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार.
शिवाजी पार्कला सभा घेणं भल्याभल्यांना घाम फोडणार काम आहे. पण साहेबांच्या सभेला अगदी या टोकापासून ते त्या टोकापर्यंत मैदान भरलेलं असे.
त्यांनी केलेल्या सगळ्याच गोष्टी योग्य होत्या असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यांनी घेतलेले सगळे निर्णय योग्य होते हेही म्हणणं चुकीचं ठरेल. पण ते बोलण्याची हे वेळ नव्हे.

एखादा राजकीय नेता जातो आणि अगदी रस्त्यावरच्या सामान्य माणसालादेखील वाईट वाटतं. आबालवृद्ध ढसाढसा रडतात हे चित्र इथून पुढे बरीच वर्षे दिसणार नाही.  मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारा, मराठी मातीवर जिवापाड प्रेम करणारा, केवळ महाराज हेच दैवत मानणारा शिवसेनेचा हा ढाण्या वाघ, हिंदुहृदयसम्राट आज काळाच्या पडद्याआड गेला. या वाघाला माझं त्रिवार प्रणाम.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.