फॉर्म्युला वनचा नवा सिझन आजपासून सुरू होतोय. गेल्यावर्षी करोनाचा परिणाम इतर सर्व खेळांप्रमाणे फॉर्म्युला वनवरही झाला. या सीझनमध्ये सुरुवातीला २२ रेसेस होणार होत्या. मात्र करोनामुळे ही संख्या १७ वर आणावी लागली. सिझन मार्च २०२० ऐवजी जुलैमध्ये सुरू झाला. या हंगामात मर्सिडीजच्या लुईस हॅमिल्टनने विजेतेपद मिळवले. त्याने मायकेल शुमाकरच्या सात फॉर्म्युला वन विजेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी साधली तसेच त्याचा ९१ रेस जिंकण्याचा विक्रमही मोडीत काढला.
आज बहारीन जीपीने फॉर्म्युला वन २०२१ च्या सिझनला सुरुवात होत आहे. या रेससाठी रेडबुलचा मॅक्स व्हर्स्टास्पेन पोल पोझिशनवर असणार आहे. हॅमिल्टन आणि बोटास हे मर्सिडीझचे संघसहकारी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरून शर्यतीला सुरुवात करतील.
मॅक्सने पहिल्यांदाच सलग दोन रेसमध्ये पोल पोझिशन मिळवली आहे.
पोल पोझिशनवर असणे मॅक्सच्या पथ्यावर पडू शकते. किमान आकडेवारी तरी तसेच सांगते. २००७ पासून २०२१, २०१६ आणि २०२० चा अपवाद वगळता, हंगामाच्या पहिल्या शर्यतीला पोल पोझिशनवर असणारा ड्रायव्हर पुढे जाऊन हंगामाचा विजेता ठरला आहे.
मॅक्स पोल पोझिशनवर असताना हॅमिल्टन पहिल्यांदाच फ्रंट रोवरून शर्यतीची सुरुवात करणार आहे.
२०१६ मध्ये निको रॉसबर्गने दुसऱ्या स्थानावरून सुरुवात करून ही शर्यत जिंकली होती. तेव्हापासून अशी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही. आज लुईस हॅमिल्टनच्या कामगिरीवर म्हणूनच सगळ्यांचे लक्ष असेल.
शर्यतीच्या अखेरीस पहिल्या तीन स्थानावर हॅमिल्टन, मॅक्स आणि बोटास हे तीन ड्रायव्हर राहिले तर तो एक विक्रम ठरेल. याआधी हॅमिल्टन, व्हेटल आणि रॉसबर्ग या तीन ड्रायव्हरने १४ वेळा पोडीयम शेअर केले आहे. आज हा विक्रम मोडीत निघू शकतो.
लँडो नॉरीस हा या हंगामातील सर्वात तरुण ड्रायव्हर असेल. तो २१ वर्षांचा आहे. ४१ वर्षीय किमी रायकोनन हा सर्वाधिक जास्त वयाचा ड्रायव्हर असेल.
वीस वर्षांपूर्वी २००१ मध्ये किमी आणि फर्नांडो अलोन्झो यांनी फॉर्म्युला वनमध्ये पदार्पण केले होते. आता वीस वर्षांनंतर ते आजही या खेळात तग धरून आहेत. त्यावेळी मायकेल शूमाकर आणि होजे व्हर्स्टास्पेन हे दोन ड्रायव्हर किमी आणि फर्नांडो बरोबर रेस करत होते. आज या दोघांची मुले मिक शूमाकर आणि मॅक्स व्हर्स्टास्पेन याच दोघांबरोबर रेस करणार आहेत.