एमीनेम – वाढदिवस विशेष

भारतात माझ्या आणि माझ्या नंतरच्याही पिढीच्या अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदा ह्याचंच रॅप ऐकलं असेल. त्यातलं फारसं काही न कळूनही आपण त्याचं रॅप ऐकतोय याच अप्रुपही वाटून घेतलं असेल. मग मित्र मैत्रिणींमध्ये आपण कुल आहोत, इंग्रजी रॅप ऐकतो म्हणून शेखीसुद्धा मिरवली असेल. त्याची गाणी ऐकतो सांगणाऱ्या ९९% जणांना त्याचं खरं नावही माहीत नसेल. पण त्याच घेणंदेणं कुणाला आहे? त्याची गाणी ऐकतोय हे खूप आहे.

तो सेकंदाला साडेसहा शब्द या वेगाने रॅप करतो. (हो, हे खरं आहे.) एका गाण्यात सर्वाधिक १५६० शब्द असण्याचा गिनेस बुक वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्याच नावावर आहे.

आपण रोजच्या जीवनातला वर्णद्वेष वगैरे बद्दल बोलतो. तो ‘व्हाईट’ असल्याने त्याला रॅपिंग क्षेत्रात असाच वर्णद्वेष सहन करावा लागला होता. कारण ‘व्हाईट’ लोक रॅप कुठं करतात? तो मात्र तिथंही पुरून उरला. अगदी डॉ. ड्रे पासून ते निकी मिनाजपर्यंत अनेकांनी तो सर्वश्रेष्ठ असल्याचं सांगितलं. कित्येक पालक आपल्या मुलांना रॅप ऐकू देत नाहीत. मात्र मुलांनी ह्याचं रॅप ऐकलं तर त्यांना काही प्रॉब्लेम नसतो एवढी विश्वासार्हता त्याने मिळवली.

गलीबॉयचे रॅप ऐकून खुश होणाऱ्या अनेकांना हा त्या सगळ्यांचा बापच नाही तर आजा आहे हे सांगितलं पाहिजे. त्याला रॅपिंगचा ‘गोट’ म्हणजेच सर्वश्रेष्ठ का म्हणतात हे जाणून घ्यायचं असेल तर त्याची गाणी ऐका. कुठली ते मी सांगत नाही. युट्यूबला सर्च टाकला तरी कळेल. आज जगात, ‘होय जगात!’असं एकही जिम नसेल की जिथे वर्कआऊटसाठी त्याची गाणी वाजत नसतील. भले वर्कआऊट करणाऱ्यांना हे गाणं कुणाचं आहे हे माहीत नसेल तरीही लोक त्याची गाणी ऐकत घाम गाळतात. त्याच्या गाण्यांमधून एक प्रेरणा मिळते हे त्याचं कारण. त्या गाण्यांमधून त्याने स्वतःचाच स्ट्रगल मांडला आहे. तो कुठेतरी सगळ्याना आपला वाटतो असंही असेल कदाचित.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्याने आपल्या रॅपवर तरुणाई थिरकवली आहे आणि आजही थिरकवतो आहे. मला रॅप करायचं तर त्याच्यासारखं करता आलं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं एवढा मोठा बेंचमार्क त्याने सेट करून ठेवलाय.

१५ ग्रॅमी, १ ऑस्कर आणि अनेक बिलबोर्ड पुरस्कार आपल्या नावावर असलेला, दोन पिढ्यांमधील तरुणाईचा लाडका रॅपर एमीनेम म्हणजेच मार्शल ब्रूस मॅथर्स (तिसरा) याचा आज वाढदिवस.. अठ्ठेचाळीस वर्षांच्या या तरुण रॅपरला शुभेच्छा..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.