किपचोगी आज इतिहास घडवणार का?

जागतिक क्रीडा विश्वात आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. का? तर केनियाचा प्रसिद्ध धावपटू एलियुड किपचोगी आज एक विशेष कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

किपचोगी कोण आहे हे माहीत नाही अशांना थोडी पार्श्वभूमी देतो. किपचोगी हा मॅरेथॉन म्हणजेच ४२.२ किमी धावण्याच्या शर्यतीचा विश्वविक्रमवीर आहे. त्याने गेल्या वर्षीची बर्लिन मॅरेथॉन २ तास १ मिनिट ३९ सेकंद वेळ नोंदवत हा विश्वविक्रम केला होता. हे करताना त्याने अगोदरच्या विश्वविक्रमाहून तब्बल १ मिनिट १८ कमी वेळ नोंदवली. जे लोक नियमितपणे धावण्याचा सराव करतात त्यांना १ मिनिट १८ सेकंदांचा वेळ कमी करणे किती कठीण गोष्ट आहे याची कल्पना असेल. किपचोगीने आजवर धावलेल्या दहापैकी नऊ मॅरेथॉनमध्ये विजेतेपद मिळवले आहे. किपचोगीने मिळवलेल्या या यशावरून त्याला आजवरचा  सर्वश्रेष्ठ धावपटू मानले जाते.

 

आजचा दिवस महत्वाचा आहे कारण आज किपचोगी आजतागायत कोणत्याही मानवाने केली नाही अशी कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तो ४२.२ किमी अंतर १ तास ५९ मिनिटांत पूर्ण करण्याचा प्रयत्न  करणार आहे. माझ्या मते हे जवळपास अमानवीय आहे. म्हणूनच त्याचं मोठं महत्व आहे. मात्र किपचोगीने हे साध्य करण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याने आपला सराव सुरू ठेवला आहे.ह्या  इव्हेंटच्या तयारीसाठी त्याने यंदाच्या बर्लिन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला नाही. आजच्या इव्हेंटसाठी वेगवेगळ्या देशांतून तब्बल ४१ धावपटू पेसमेकर्स म्हणून किपचोगीबरोबर धावणार आहेत.

 

आपले ध्येय साध्य करण्यासाठी किपचोगीला ५ किमी अंतर १४ मिनिटे १३ सेकंद, १० किमी अंतर २८ मिनिटे २६ सेकंद, २१.१ किमी ५९ मिनिटे ५९ सेकंदात पूर्ण करत हाच वेग पुढचे २१.१ किमी कायम ठेवावा लागणार आहे.म्हणजेच २ मिनिट ४९ सेकंद प्रतिकिमी एवढ्या वेगाने त्याला धावावे लागणार आहे. वाचताना हा वेग फार वाटत नसेल तर एक साधं उदाहरण देतो. अनेक हौशी धावपटू १० किमी अंतर ७० ते ८० मिनिटांत धावतात. ६० मिनिटांपेक्षा कमी वेळेत १० किमी धावणे ह्याला हे धावपटू मोठी कामगिरी मानतात. कसलेले धावपटू हेच अंतर ३५-४५ मिनिटांत पूर्ण करतात. किपचोगी हेच अंतर २८ मिनिटांत धावण्याचा प्रयत्न करतोय. यावरून त्याच्या या कामगिरीचे महत्व ध्यानात येईल.

 

आज सकाळी १० वाजता ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे हा इव्हेंट होणार आहे. या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण

 

या वेबसाईटवर किंवा

 

या युट्युब लिंकवर पाहता येईल. एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायचे असल्यास हा इव्हेंट चुकवू नका.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.