विसर्जन आणि पडद्यावरचे दुर्लक्षित शिलेदार

गणपती विसर्जन मिरवणूक हा मोठा सोहळा असतो. मंडळाचे कार्यकर्ते रात्रीपासून राबत असतात. मिरवणुकीचा रथ तयार करणे, मूर्ती कुठे ठेवायची, कशी ठेवायची याची चर्चा होत असते.

 

मिरवणूक सुरू होताना जेव्हा मूर्ती रथावर ठेवली जाते, तेव्हापासून ते मिरवणूक संपेपर्यंत एक दोन कार्यकर्ते मूर्तीजवळच थांबतात.छोट्या गावांमध्ये तर मूर्तीजवळ एखादाच कार्यकर्ता असतो. ह्याचं एक काम नसतं. मूर्तिजवळ बसल्या बसल्या हे बरीच कामं करत असतात. कामं म्हणजे मिरवणूक मार्गात येणाऱ्या भक्तांकडून आलेले हारतुरे स्वीकारणे, कुणी रथावर चढून दर्शनाला आले तर त्यांचा मूर्तीला धक्का लागणार नाही याची दक्षता घेणे, कुठे काही वायर वगैरे मध्ये आलं तर ते जमेल तसं हाताने वर करून मूर्ती पास होईल याची काळजी घेणे, ते नाही जमलं तर ट्रॉलीमध्ये असलेल्या पोरांना आधीच त्याबद्दल कल्पना देऊन बांबूने वायर वर करायला सांगणे, हे सगळं करत असताना कुणी प्रसाद मागितला तर ट्रॉलीतुन खाली वाकून त्यांना प्रसाद देणे. त्यातल्या त्यात आपल्या जवळचं कुणी दिसलं तर त्यांना हे स्वतःहून जवळ बोलावून घेतात. थोडासा जास्तच प्रसाद, जमलंच तर आलेल्या नारळांमधला एखादा नारळही त्यांना देऊन खुश करतात. कुठे एखादा मित्र, नातेवाईक आपापल्या मुलांबरोबर दिसले तर हे त्यांच्या मुलांना ट्रॉलीमध्ये घेऊन अगदी बाप्पाच्या जवळ नेऊन दर्शन करवतात. आपल्या लेकराचं डोकं बाप्पाच्या पायाला टेकलं म्हणून आईवडीलही आनंदी होतात.

 

बऱ्याच मंडळांमध्ये मूर्तीजवळ बसणारे हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे तेच असतात. ह्यांना नाचण्यात रस नसतो की पुढारपण मिरवण्यात. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत आपण बरोबर असावं अशा भावनेतून हे लोक काम करत राहतात. मंडळांमध्ये ह्या कार्यकर्त्यांना सगळे नावाने ओळखतात. अगदी लहानसहान मुलेही त्यांना नावानेच हाक मारतात. त्यांनाही त्याचे काही वाटत नाही. आजवर ह्या मूर्तीजवळ बसणाऱ्या कार्यकर्त्यांचं कौतुक झालेलं मी तरी पाहिलेलं नाही. त्यांनाही कदाचित त्याची अपेक्षा नसते. पुलंचा नारायण लग्नात दिवसभर राबूनही निरपेक्षवृत्तीने कार्य सिद्धीस नेतो अगदी तशीच ही माणसे असतात.

 

जुन्नरला कल्याण पेठेच्या मिरवणुकीत बरीच वर्षे ही जबाबदारी जना गोसावी ह्यांच्याकडे असते. पोरांसाठी ते जनामामा किंवा जनाकाका. मी अगदी लहान असल्यापासून जनामामांना मूर्तीजवळ बघत आलोय.त्यांचं कौतुक झाल्याचं, कुणी त्यांचे आभार मानल्याचं ऐकिवात नाही किंवा कधी पाहिलंही नाही. प्रत्येक मंडळात असे जनामामा असतील. ह्या निमित्ताने पडद्यावर असूनही दुर्लक्षित असणाऱ्या तमाम जनामामांना एक सलाम.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.