सूर्यवंशी सर

सूर्यवंशी सरांशी पहिली ओळख अकरावीत झाली. ते आम्हाला इंग्रजी शिकवत. आठवीत असताना इंग्रजीच्या व्याकरणाचा पाया डुंबरे सरांनी तयार करून घेतला. शाळेत नववी,दहावीला माकुणे सरांनी इंग्रजी विषय इंग्रजीतून शिकवला. पुढे अकरावी, बारावीला सूर्यवंशी सरांनी तेच केले. आपल्याकडे इंग्रजी विषय अनेकदा मराठीतून शिकवला जातो.सूर्यवंशी सरांनी ते करणे कटाक्षाने टाळले. कविता असो किंवा गद्य, त्याचा अर्थ त्यांनी कायम इंग्रजीमधूनच समजावून सांगितला.  त्यामुळे नकळतपणे आम्हाला इंग्रजी कानावर पडत असे. कधी कधी सर वर्गात येऊन एक दोन जणांना उभे करत.त्यांना एखादा विषय देऊन त्यावर इंग्रजीतून चर्चा करायला लावत.सुरुवातीला इंग्रजी बोलताना हसू येई.नंतर मात्र सवय होऊन गेली. बोलताना आम्हाला काही अडचण आली, योग्य शब्द सापडला नाही तर सर मदतीला असतच.मला या चर्चांचा पुढे बराच उपयोग झाला. मी माझं म्हणणं इंग्रजीतून मांडताना अनेकदा दोन वाक्यांच्या मध्ये ‘म्हणजे’ हा शब्द वापरे.तो आपसूक माझ्या तोंडी येई.सरांनी ते बरोबर पकडले आणि मला त्या ऐवजी ‘आय मीन किंवा आय मीन टू से’ हे वापरण्याचे सुचवले.मी आजतागायत ते करतो आहे.
आपल्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन इंग्रजी बोलताना अडचण येऊ नये या भावनेतून सर आम्हाला इंग्रजी बोलायचा सराव करायाला लावत. या चर्चांचे विषयही आम्हाला आवडतील असे असत.कधी सचिनची बॅटिंग, कधी सध्याची राजकीय परिस्थिती तर कधी अगदी लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज असेही विषय असत.एक आठवण सांगतो. लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज या चर्चेत दोन्ही बाजूकडची मुलं आपली बाजू तावातावाने मांडत होती.सर आपल्या परीने तटस्थ राहून चर्चा पुढे नेत होते. सरांनी लव्ह मॅरेज केलेय हे माहीत असलेल्या मी एका मुद्द्यावर उभे राहून म्हटले,
“Even you chose to go ahead with Love Marriage. In that case, you should support us.”
माझं हे वाक्य ऐकताच सगळा वर्ग हास्यात बुडाला.सरांनाही हसू आवरले नाही आणि अखेरीस त्यांनी आमची बाजू घेतली.
बारावीनंतर जुन्नरमधून बाहेर पडलो.जुन्नरला गेल्यावर अधून मधून सरांना भेटणे होत असे.त्यावेळीही त्यांच्याशी इंग्रजीतूनच संवाद होई. बारावी संपून आता पंधरा वर्षे होतील.सर आजही संपर्कात असतात.माझे ब्लॉग नियमित वाचत असतात.काही चूक वाटली तर आवर्जून तसे सांगतातही. आज सर सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा दाटून आल्या. सरांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.