टेनिसप्रेमींना विठ्ठलाचे रूप पाहिल्याचे सुख देणारा सामना !!

काल ज्यांनी रॉजर राफा ची मॅच लाईव्ह पाहिली ते नशीबवान म्हणावे लागतील. परत या दोघांत विंब्लडनमध्ये लवकर सामना होईल असे वाटत नाही. (असं फक्त म्हणतोय, ज्या लेव्हलला हे दोघे आणि जोकर खेळत आहेत ती पाहता पुढच्या वर्षी पुन्हा एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.) अकरा वर्षांपूर्वी या दोघांच्यात झालेली विंब्लडन फायनल राफाने जिंकली. यावर्षी काय होईल काहीच सांगता येत नव्हते. सिझनची सुरुवात अडखळत केलेल्या राफाने फ्रेंच ओपनला बरोबर खेळ उंचावत ती खिशात घातली. रॉजरने फ्रेंच ओपन जिंकण्याचा अजून एक प्रयत्न यंदा केला.मात्र उपांत्य फेरीत क्ले कोर्टच्या बादशहाने त्याला पाणी पाजले.
रॉजर थांबणाऱ्यातला नाहीच. त्याने ते तिथेच सोडून आपल्या आवडत्या ग्रास कोर्ट सिझनवर लक्ष केंद्रित केले. यावर्षीचा ड्रॉ आला तेव्हाच या दोघांत लढत होईल अशी अटकळ होती.ती खरीही झाली.
रॉजर राफाने इतक्या उच्च दर्जाचे टेनिस खेळलंय की खेळाडू म्हणून ते दोघेच नाही तर दोन्हीकडचे समर्थकही हार जीत याच्या पलीकडे गेले आहेत.या दोघांचं इतक्या उच्च दर्जाचं टेनिस परत कधी पहायला मिळणार? त्यापेक्षा नशिबाचे आभार मानत मिळतंय ते डोळ्यांत सामावून घ्या असाच काहीसा विचार जगभरातले टेनिसप्रेमी करत असतील.. निदान मी तरी करतो..
काल सेंटर कोर्ट तर भरलेच होते, पण हेन्मन हीलवरही तोबा गर्दी होती. एक वेळ तर अशी आली की आयोजकांना हेन्मन हीलवर लोकांना प्रवेश बंद करावा लागला.
रॉजर एरवी नजाकतीने खेळतो तर राफा प्रतिस्पर्ध्याला दमवून जिंकण्यासाठी प्रसिद्ध आहे. कालच्या सामन्यातला रॉजर मात्र नेहमीपेक्षा वेगळाच होता. आज राफाचा बाजार करायचाच अशा निग्रहानेच जणू तो कोर्टवर उतरला. पहिल्या सेटमध्ये दोघे एकमेकांना भिडले. रॉजरच्या जोरदार सर्व्हचे उत्तर राफा तितक्याच जोरदार सर्व्हने देत होता. अपेक्षेप्रमाणे हा सेट टाय ब्रेकमध्ये गेला. इथे खरा या सामन्यातला आनंद सुरू झाला. वारकऱ्यांना जसे विठ्ठलाचे रूप पाहून सुख मिळते तसे या दोघांनी टेनिस चाहत्यांना विठ्ठलाचे रूप पाहिल्याचे  सुख देण्यास सुरुवात केली. राफाने हा टायब्रेक जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू करताच रॉजरने आपल्या भात्यातले ‘टर्बो’ बटन दाबले आणि राफा सावरायच्या आत सेट घेऊन मोकळा झाला.
अशाने डगमगून जाईल तो राफा कसला? त्याने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार कमबॅक केला. रॉजरची सर्व्हिस ब्रेक करत आघाडी घेतली. अडतीस वर्षीय रॉजरने इथे या सामन्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतला.त्याने राफाची सर्व्हिस पुन्हा ब्रेक करण्याचे कष्ट न घेता दुसरा सेट राफाला बहाल केला.  हे करण्यामागे रॉजरचे चाणाक्ष धोरण दिसून आले. राफा काही सहजासहजी पॉईंट्स देणारा खेळाडू नाही. त्याची सर्व्हिस ब्रेक करण्याच्या नादात आपली दमणूक होणार हे रॉजरने जाणले आणि त्यासाठी एका सेटची कुरबानी दिली. असे करून त्याने आपली एनर्जी वाचवून ठेवली.
तिसऱ्या सेटपासून मात्र हा सामना म्हणजे सबकुछ रॉजर असाच झाला.त्यावेळी रॉजरसमोर राफापेक्षा अजून कुणी प्रतिस्पर्धी असता तर त्याला राफाने जिंकेलेले गेम्सदेखील रॉजरने जिंकू दिले नसते. राफाने फक्त त्याच्या लढाऊ वृत्तीच्या जोरावर हे गेम जिंकले. पण रॉजरचा हल्ला परतवून लावणे त्याला शक्य झाले नाही. चौथ्या सेटमध्ये त्याने ज्या पद्धतीने मॅच पॉईंट्स वाचवले त्यावरून राफा समर्थकांच्या मनात अंधुकशी आशा निर्माण झाली. मात्र तोवर बराच उशीर झाला होता. समोर कुणी लेचापेचा प्रतिस्पर्धी नव्हता तर साक्षात फेडरर होता.तो हातातोंडाशी आलेला घास इतक्या सहज सोडणार नव्हता.त्याने सामना हातचा जाऊ न देता राफाला पराभूत केले. सामन्यानंतर रॉजर म्हणाला,
“मी थकलोय. शेवटीशेवटी राफाने खूपच उच्च दर्जाचा खेळ केला.राफा बरोबरचे सामने नेहमीच खास असतात.हाही तसाच होता.”
ह्या सामन्यात रॉजरची फर्स्ट सर्व्ह ६८% होती ज्यात १४ एसेस होत्या. विंब्लडनमध्ये रॉजर जेव्हा फर्स्ट सर्व्ह ७०% च्या आसपास नेतो तेव्हा त्याला पराभूत करणे जवळपास अशक्य असते.
रविवारी फायनलला रॉजरची गाठ जोकोविच या अजून  एका दिग्गजाशी पडणार आहे. आजवर रॉजरने कोणत्याही मोठ्या स्पर्धेत राफा आणि जोकर या दोघांना कधीही पराभूत केलेले नाही.जोकरही विजेतेपदासाठी भुकेला आहे.या ब्लॉकबस्टर सामन्यासाठी रविवार राखून ठेवा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.