विश्वचषक २०११ चा पडद्यामागचा शिलेदार

काल भारत विश्वचषकातून बाहेर पडला. याहून वाईट परिस्थिती २००७ च्या विश्वचषकात झाली होती. धोनी, झहीर खानच्या घरावर दगडफेक झाली होती, तेंडुलकर,गांगुली यांच्या हॉटेल्सवर हल्ला झाला होता. सगळे चिंतेत बसले असताना तो मात्र शांत होता. सचिनने त्याला विचारलं,
“तुझ्या घरी सगळं ठीक आहे ना?”
“पाजी माझ्या गावात ८००० लोक आहेत आणि सगळे माझे आहेत.”
तो खेळाडू होता मुनाफ पटेल.
त्यांतनर चार वर्षांनी विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. झहीर आणि युवी पाठोपाठ त्यानेही ११ बळी मिळवले होते.
एक वेळ अशी होती की मुनाफ गावातल्या एका फॅक्टरीमध्ये ३५ रुपये रोजाने काम करत असे. गावातल्याच एका मित्राने त्याला ४०० रुपयांचे बूट घेऊन दिले आणि बडोद्याला पाठवले. तिथे एका क्लबकडून खेळताना त्याला किरण मोरेंनी पाहिले आणि आपल्या क्लबसाठी खेळण्याची ऑफर दिली. त्याच्या गोलंदाजीचा वेग पाहून मोरेंनी त्याला चेन्नईच्या एमआरएफ पेस अकादमीमध्ये पाठवलं.तिथे डेनिस लिलीच्या मार्गदर्शनाखाली मुनाफने गोलंदाजीचे धडे गिरवले. मुनाफची गुणवत्ता पाहून स्टीव्ह वॉसुद्धा खुश झाला आणि त्याने तेंडुलकरला मुनाफबाबत सांगितले. तेंडुलकरने त्याला मुंबईकडून खेळण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर काही वर्षे तो मुंबईकडून खेळला.
२००९ ते २०११ दरम्यान तो भारतीय संघाचा नियमित सदस्य होता.  भारताच्या २०११ दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेला ४८ चेंडूत ४ धावा लागत असताना मुनाफने दोन बळी मिळवत भारताला विजयी केले होते. याच कामगिरीमुळे त्याची २०११ च्या विश्वचषकातही निवड झाली.
२०११ नंतर मात्र दुखापतीमुळे तो पुन्हा कधीच भारतीय संघात येऊ शकला नाही. सध्या तो गुजरातमधील इखर या त्याच्या गावात राहतो. त्याला गरज होती तेव्हा कुणीतरी मदत केली होती याची जाण ठेवून घरी येणाऱ्या प्रत्येकाला जमेल तेवढी मदत करतो.
मुनाफची गोलंदाजीची शैली बरीचशी ग्लेन मॅकग्राच्या शैलीशी मिळतीजुळती होती.बरेचजण त्याला त्यावरूनच लक्षात ठेवतात.आज अनेकजण विसरूनही गेले असतील.आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो काहीजणांना आठवेलही कदाचित.
#HappyBirthdayMunfaPatel

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.